Sunday, February 15, 2009

Valentine Day…or Violence Day

आजच्या पेपरमधल्या बातम्या वाचुन खुप राग, फ्रस्ट्रेशन आलं असं वाटायला लागलं. त्या headlines मध्ये होतं व्हायोलन्स डे!... 'हे तर हिंदू तालिबानीकरण!'. कालच्या 'व्हॅलंटाइन डे' निमित्ताने देशभरातल्या तथाकथित संस्कॄती रक्षकांनी महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत यथेच्छ घातलेला गोंधळ. हा गोंधळ नक्की कशासाठीचा होता? असा गोंधळ घातल्याने खरंच आपली संस्कृती वाचते का? पुण्यात झालेला जबरदस्तीने प्रेमी युगुलांना फुलांच्या मुंडावळ्या बांधून, एकमेकांना हार घालायला लावून प्रतिकात्मक लग्न लावण्याचा प्रकाराने नक्की काय साधायचं होतं? एखादा मुलगा आपल्या संघटनेने घातलेली बंदी झुगारुन व्हॅलंटाइन डे साजरा करण्याचा प्रयत्न करतो म्हणुन त्याचं चक्क गाढविणीशी लावून देण्याचा जो प्रकार काल मिरजेत घडला तो खरंच संस्कृती रक्षणाचा प्रयत्न होता का? या अशा जबरदस्तीची लग्न लावुन, तरुणाचे लग्न चक्क गाढविणीशी लावून खरंच आपली संस्कृती वाचते का? आपली संस्कृती खरंच इतकी तकलादू असते का? या निमित्ताने एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी की, या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध भागात घडत असताना मुंबई मात्र तशी शांतच होती. या वेळी मुंबई शांत राहण्यामागे लवकरच येऊ घातलेल्या निवडणूका हे असू शकतं. शहरातल्या तरुण वर्गाला दुखवणं हे शिवसेनेसारख्या पक्षाला परवडणारं नाही हे या पक्षाचे नेते जाणून होते. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो त्या ठाण्यातही कुठेही व्हॅलंटाइन डेला गालबोट लागलं नाही. पण त्याचवेळी राष्ट्रवादीने तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांचे हे प्रकार म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोप करत हा दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची भूमिका मांडली. ठाण्यात आमदार जितेंद आव्हाड यांनी चक्क व्हॅलण्टाइन कार्ड्स आणि गिफ्ट्सचं दुकानच थाटलं. परंतु, हे प्रकार म्हणजे राजकीय पक्षांनी चालवलेले पब्लिसिटी स्टंट आहेत हे न कळण्याइतकं कोणीही मूर्ख नाही हे बहूधा राजकीय पक्षांची मंडळी विसरली असावीत. कोणते सण उत्सव कोणी साजरे करावेत या बाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोण्त्याही राजकीय पक्षांना किंवा तथाकथित संस्कॄती रक्षकांना नाही हे त्यांच्या लक्षात आणून देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

कपिल चव्हाण
१५.०२.२००९