Tuesday, August 12, 2014

त्यांची 'संस्कृती', आमचा 'संघर्ष'


बालगोविंदाची मृत्यूशी झुंज, जिवाशी खेळ! दहीहंडीआधीच दोन गोविंदांचा मृत्यू या आणि अशा हेडलाईन्सनी अस्वस्थ केलं होतं. त्यात आज उच्च न्यायालयाने या उत्सवावर काही निर्बंध आणले. हिहंडीतील गोविंदांचं वय १८ वर्षांपेक्षा कमी नको आणि मनोऱ्यांची उंची २० फुटांपेक्षा जास्त नको, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला आहे. दहिहंडीचं आयोजन रस्त्यावर न करता ते खुल्या मैदानात करावं आणि खाली कुशन वापरावेत, अशा सूचनाही हायकोर्टानं केल्या आहेत.

मात्र हे सर्व घडत असताना महाराष्ट्राच्या संस्कृतीची काळजीसाठी सतत 'संघर्ष'रत असणारे जितेंद्र आव्हाड यांनी मात्र दहीहंडी ही मुंबई-महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे दहीहंडी हा खेळ जिवंत राहाण्यासाठी मी प्रयत्न करणारच असा पवित्रा घेतला आहे. स्वत:ला हिंदुत्त्ववादी म्हणवणारे आता मात्र हिंदूंच्या सणाच्या बाजून उभे राहत नाहीत, हे दुर्दैवी असल्याचंही आव्हाड म्हणाले.

सण, उत्सव हे एकमेकांना एकमेकांशी जोडण्यासाठी असतात. समाज प्रबोधनासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण उत्सवांचं बाजारीकरण करण्याच्या इराद्याने स्थापना झालेल्या मंडळानी दहीहंडीच्या निमित्ताने उत्सवाचं हिडीस रूप लोकांसमोर उभं केलं आहे. आपण आपली संस्कृती रक्षण करण्याच्या नादात अनेक गोविंदा आपल्या प्राणांना मुकले आहेत याची खंत ना या आयोजन करणाऱ्या मंडळाना आहे ना सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे राजकारणी या सर्व वादाच्या निमित्ताने आपली व्होट बँक विस्तारित करण्याच्या दृष्टीनेच बघतात हे अजून एक दुर्दैव.

दहीहंडी हा साहसी क्रीडा प्रकार आहे असा तर्कही कायम पुढे येत असतो. पण मग या क्रीडा प्रकारचे नक्की नियम काय? यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षीततेचं काय? जर या क्रीडा प्रकारच्या सरावादरम्यान खेळाडू जखमी झाला तर त्याच्या उपचाराचा खर्च कोणाचा? आणि जर मृत्यू झाला तर... असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं द्यायला मात्र दहीहंडीचे आयोजक तयार नाहीत.

दहीहंडी साजरी करण्याबाबत आक्षेप असण्याचं कारणं नाही. पण दहीहंडीचा मेगा इव्हेंट बाबत मात्र आक्षेप नक्कीचं आहे. गोविंदा पथकातल्या लोकांच्या जीवाशी खेळण्याबाबत आक्षेप आहेत. या मेगा इव्हेंटच्या आयोजनासाठी उधळल्या जाणाऱ्या पैश्याबाबत आक्षेप आहे. पण या सर्वांची दखल कोण घेणार कारण आम्हालाही घरात बसून या मेगा इव्हेंटचं लाइव्ह टेलिकास्ट बघण्यात अधिक रस असतो. कारण ही आमची संस्कृतीही नसते आणि हा आमचा संघर्षही नसतो.