Sunday, February 8, 2009

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

मला रविवारी ऑफिसला यायला किंवा कुठेही बाहेर जायला खुप आवडत कारण ट्रेनला असणारी कमी गर्दी. पण आजचा रविवार मात्र तसा नव्हता म्हणजे गर्दी तशी कमीच होती. माझा बाजूला एक माणुस त्याच्या लहान मुलाला घेउन बसला होता. तितक्यात त्यांच्या परिचयातला एक माणुस त्यांच्या समोर येउन बसला. त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. गप्पांचा ओघ सुरुवातीपासूनच एका बापूंकडे होता. ते दोघही त्या बापुंचे भक्त होते. त्यांच्यापैकी एकाने आपल्या शर्टाच्या खिशाजवल त्या बापुंचा फोटो लावला होता. थोड्यावेळाने माझ्या बाजूला बसलेल्या माणसाने आपल्या मुलाला बापुंची भजन आणि इतर आरत्या कशा येतात याचं कौतुक सांगायला लागला. एवढ्यावरंच त्याच समाधान झालं नाही. मग त्याला त्या आरत्या त्या २ वर्षांच्या लहान मुलाकडून गाउन घेण्याची हुक्की आली. पण ते लहान मूल काही बधलं नाही. ते मूल आपल्या बालसुलभ निरीक्षणं करण्यात व्यस्त होतं. तो माणुस परत परत त्याला त्या आरत्या म्हनण्यासाठी प्रवृत्त करत होता. पण त्या मुलाने शेवटपर्यंत ऐकल नाही. त्या लहान मुलाने केलेल्या फजीती नंतर त्यांनी आपली चर्चा बापूंनी लिहिलेल्या नव्या लेखाकडे वलवली. त्या लेखात त्या बापूंनी अशी भविष्यवाणी केली आहे की, २०१२ साली तिसरं महायुध होणार आहे आणि जे त्यांची उपासना करत असतील त्यांना काही होणार नाही. या सर्वांवर कोटि करणारी काही विधानं हे दोन भक्त करत होते. एक जण म्हणाला की बापू हा साईं बाबांचा नवा अवतार आहे. जसं साईं बाबा गेल्यावर खुप जनाना पश्चाताप झाला तशी संधी बापू जिवंत असताना देतील जे ही संधी स्वीकारतील ते या महायुधातुन वाचतील. तोड्यावेळात त्यांचं स्टेशन आल्यावर ते उतरून गेले आणि माझ्या मनात बरेच विचार मात्र मागे उरले.

एखादा माणुस खरंच देवत्त्वाच्या रेषेपर्यंत जाऊ शकतो का?

जो माणुस देवत्त्वाच्या रेषेपर्यंत पोहोचला आहे तो आपल्या भक्तांना किंवा अनुयायांना फक्त माझी भक्ति कराल तरच वाचाल अशी शिकवण देऊ शकतो का?

कुठ्चाही देव राग अथवा लोभ मनात ठेउन मानसांना वाचवतो का? जर तसं असेल तर त्याला देव का म्हणायचं? ( कारण माणसामधेही राग-लोभ असतात आणि त्याच कारणाने ते एखाद्याचं भलं किंवा नुकसान करत असतात. )

या बाबत तुमची असणारी मतं मला सांगायला विसरु नका.

- कपिल चव्हाण